सर्प-देवता : जागतिक रुढी आणि परंपरा

Articles Recent Work

सर्प अथवा नाग ही देवता म्हणून संपूर्ण भारतात त्याचे महत्त्व आहे. साधारणपणे सौम्य व उग्र असे देवतांचे स्वरूप दिसते. दैवतशास्त्रीय तत्त्वानुसार उग्र देवतेच्या कोपापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी म्हणून देवतांचे पूजन केले जाते. हाच भाव नागपूजनामागेदेखील असावा. क्लेशकारक व कल्याणकारक अशा दोन्ही छटा नाग/सर्पपूजनामागे असल्याचे दिसते

समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करता असे दिसून येते की नाग म्हणजे नागपूजक जमात (टोटेमिक ट्राइब) प्राचीन काळापासून अस्तित्त्वात असावी. यांचा संघर्ष हा बऱ्याचदा वैदिक देवतांशी आलेला दिसतो. त्यानंतर वैदिक देवता व पंथ यांच्यामध्ये नागवंशीयांना सामावून (assimilation) घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. नागपंथ या पूर्ववैदिक किंवा अवैदिक असावा असे अभ्यासकांचे मत आहे. आर्यसमूहाचा आर्येतर नागवंशीयांशी संघर्ष झाल्याची उदाहरणे प्राचीन ग्रंथांमध्ये दिसून येतात उदा. महाभारतातील खांडववनदाह, जनमेजयाचे सर्पसत्र वगैरे. नागवंशीयांना सामावून घेण्याचे अनेक प्रयत्न महाभारत व पुराणकाळात घडल्याची उदाहरणे काही कथांमध्ये दिसतात. कृष्णाचे कालियनागमर्दन हा वैष्णवपंथ व नागजमातीमधील संघर्ष सूचित करतो. भागवतपुराणात म्हटल्याप्रमाणे कृष्णाने कालियनागावर नर्तन करुन स्वत:ची पदचिन्हे अंकित केली व त्याला अभयदान दिले. याचाच अर्थ वैष्णवसंप्रदायामध्ये नागांना दिलेले महत्त्वपूर्ण स्थान होय. शेषशायी विष्णु हे प्रतीक देखील समन्वयाचे सूचन करते. शिवाने कंठामध्ये धारण केलेला सर्प हे शैवपंथीयामध्ये झालेले नागांचे समावेशन दर्शविते. जातककथांमध्ये नाग बोधिसत्त्वांचे अनुयायी दिसतात. मुचलिंद नाग व बुध्द यांच्या अमरावतीमधील शिल्पामध्ये पंचफणाधारी नाग बुध्दावर छत्र धरताना चितारला आहे. कंबोडियामधील बेयन मंदीरामध्ये ध्यानस्थ बुध्द सप्तफणाधारी नागावर विराजमान आहे. जैन तीर्थंकर पार्श्वनाथाच्या मस्तकावर देखील नागाचे फणाछत्र दिसून येते. भारतातील वैष्णव, शैव, शाक्त, जैन, बौध्द धर्मांमध्ये नागांना सामावून घेतल्याची उदाहरणे दिसतात. जगभरातील प्राचीन पुराकथांमध्ये सर्पांना सामावून घेण्याची प्रक्रिया झाल्याचे  दिसून येते. प्राचीन धर्मांच्या पुराकथांमध्ये सर्पप्रतिमा, सर्पमूर्ती अथवा सर्पप्रतीके विविध अर्थ सूचविताना दिसतात.

प्रजननदेवता:

प्राचीन काळापासून नाग अथवा सर्पाचा संबंध जलतत्त्वाशी असलेला दिसून येतो. ऋग्वेदामध्ये वृत्राचे वर्णन करताना तो सर्पासारखा वेटोळे घालून पाणी अडवून ठेवतो असे त्याचे वर्णन येते. इंद्र हे वृत्राने अडवलेले पाणी मोकळे करतो अशी त्याची स्तुती केलेली दिसते. जलतत्त्व हे नवनिर्मितिशी संबंधित आहे. त्यामुळे भारतातच नाही तर जगभरात सर्प हे पाण्याशी संबंधित किंवा निर्मिती, संतती, प्रजनन यांच्याशी संबंधित असल्याचे दिसतात. कालियनाग देखील यमुनेच्या डोहामध्ये राहत असल्याचे दिसते.

अल्बानियातील लोककथांमध्ये कुलशेद्र नावाचा सर्प जलनाश करु शकतो व नरबळींनी संतुष्ट होतो. नेपित ही इजिप्शियन स्त्रीदेवता सुफलनाशी संबंधित आहे. तिच्या डोक्यावर धान्य किंवा सर्प दाखविला जातो.  मोरोक्कोमधील हरुन व हरुना या पाण्याशी संबंधित  शक्ती सर्परूप धारण करत असत. त्यांना संतुष्ट करण्यासाठी विविध खाद्यपदार्थ लोक नदीला अर्पण करीत असत. सुझनोवो नावाचा जपानी देव समुद्राशी सबंधित असून त्याच्या प्रतीकांमध्ये सर्पाचा समावेश आहे. फिलिपाईनमधील प्राचीन मान्यतांच्या मते, बकुनावा नावाचा सर्प समुद्र, जल, पाऊस, भूकंप व ग्रहण यांच्याशी संबंधित आहे.

मेक्सिकोच्या ॲझटेक संस्कृतीमधील केत्सालकोआत्ल हा देव पंखधारी सर्पाकृती पक्षी अशा स्वरुपात दर्शविलेला आढळतो. हाच देव माया संस्कृतीमध्ये ’कुकुलकन’ या नावाने ओळखला जातो. यांचा संबंध धान्य, कला व विज्ञान यांच्याशी असल्याचे दिसते. त्लालोक नावाचा पर्जन्यदेव हा ढग, पर्वत, झरे व तलाव यांच्याशी संबंधित आहे.  हा प्रजननाचा देव मानला जातो. हातात सर्पधारी दंड हे त्याचे चिन्ह आहे. ईजिप्तमध्ये रेनेनुतेत नावाची स्त्रीदेवता शेती व भरणपोषणाशी संबंधित दिसते. तिची चित्राकृती सर्पप्रतिमा अथवा सर्पशीर्षधारी स्त्री अशी दिसून येते. त्याचप्रमाणे ही देवता संततीरक्षण तसेच फेरोंच्या रक्षणाची अधिष्ठात्री देवता होय. शेतात उगवलेली पिके व द्राक्षे तिला अर्पण केली जात. ऑस्ट्रेलियाच्या आदिमसंस्कृतीमधील पर्जन्य व प्रजननाशी संबंधित सर्पाकृती देव वुलनकुवा हा भव्य इंद्रधनुष्याच्या स्वरुपात दिसतो. एनिगना ही स्त्रीदेवता सर्पाकृती असून भूमि, जल व निर्मिती या तत्त्वांशी संबंधित आहे.

डीमीटर नावाची ग्रीक स्त्रीदेवता भूमि, शेती व सुफलनाशी संबंध दाखवते. थेस्मोफोरिया नावाचा उत्सव डीमीटरच्या पूजनार्थ केला जात असे. हा उत्सव पेरणीच्या वेळी दरवर्षी केला जात असे. यामध्ये विवाहित स्त्रियांना सहभागी होता येत असे. सर्प व लिंगप्रतिमांचे उपयोजन केले जात असे.  दोन वेटोळे घातलेले व परस्परांमध्ये गुंतलेले सर्प असलेला दंड हे ग्रीक देवता हर्मिसच्या हातात दर्शविले जातात.

Figure 1: Demeter

इन्द्रधनुष्य-सर्प ही संकल्पना जगभरातील आदिम संस्कृतींमध्ये दिसून येते. नानाविध प्राचीन संस्कृतींमध्ये ही संकल्पना वेगवेगळ्या नावांनी प्रचलित आहे. आफ्रिकन संस्कृतींमध्ये जलसंरक्षक अशा सर्पाची संकल्पना आढळते. स्त्रिया देवळात संततीसाठी प्रार्थना करीत आणि संतती प्राप्तीनंतर सर्पाला ते सांगण्याचा प्रघात होता. मानवी आत्मा, अलौकिक शक्ती किंवा दुष्ट शक्ती या सर्पामध्ये राहतात. पुनर्जन्म किंवा जीवनाची अव्याहत नित्यता ही कारणे सर्पपूजनामागे आहेत.

दक्षिण नायजेरीयामधील ईसा लोकांच्या समजूतीप्रमाणे पूर्वज पृथ्वीवर पाऊस पाठवतात. इन्द्रधनुष्य हे पावसाच्या आगमनाची सूचना देतात. आफ्रिकेतील कलबारी प्रदेशातील लोकांच्या समजुतीनुसार इन्द्रधनुष्य हा आकाशातील विशाल सर्प होय. ओशुमेर हा सर्पदेव स्लाव- कोस्टमधील समजतीनुसार पाताळातून येणारा विशाल इंद्रधनुष्य-सर्प होय. आसमंतामधून होणाऱ्या जलधारांचे प्राशन करण्यासाठीच हा सर्प क्षितिजावर अवतरतो. योरुबा संस्कृतीमध्ये एरे नावाचा सर्प इन्द्रधनुष्यदेवतेचा दूत समजला जातो त्यामुळे सर्पाला अत्यंत आदर दिला जातो. झुलु पुराकथांप्रमाणे इन्द्रधनुष्य-सर्प हे विहिरींचे संरक्षण करतात. अबेनयोबि लोकांमध्ये सर्प धान्य देणारा मानला जाई. पर्वतांच्या खालील धान्यांचे संरक्षण सर्प करतो. त्यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये धान्यसंरक्षक सर्प पाळल्याचे दिसते. इकोई सर्पांची चरबी औषध म्हणून वापरत. मादागास्करमधील फनानी संप्रदायाच्या समजुतीप्रमाणे मृतात्मे सर्पामध्ये राहतात. वागिकुयु  नामक जनसममूहानुसार सर्पांचा गूढ संबंध आत्म्यांशी आहे. सर्प गावात आल्यास दूध व मांस सर्पांना अर्पण केले जाई. प्राचीन चीनी मान्यतेनुसार ड्रॅगन (आग ओकणारा विशालकाय सर्प) हा जलतत्त्वाशी संबंधित आहे. हिवाळ्यात जलशयन करणारा हा प्राणी पावसाळ्यात जागृत होतो. पर्जन्याचा कारक असून तो पिके देणारा आहे.

सृष्टीच्या निर्मितिकथांमध्ये सर्पाचे महत्त्व दिसून येते. अब्राहमिक पंथांमध्ये मनुष्याच्या पतनाला सर्प कारणीभूत झाल्याचे दिसते. आदम व ईव्ह ईश्वरासोबत ईडन नंदनवनात राहत होते. सर्पाने प्रवृत्त केल्यामुळे ईव्हने पापपुण्याचे ज्ञान देणाऱ्या वृक्षाचे अर्धे फळ स्वत: खाल्ले व अर्धे आदमला दिले. ईश्वराने निषिध्द केलेल्या झाडाचे फळ ग्रहण केल्याने मनुष्याच्या पापमय जीवनास आरंभ झाला असे मानले जाते.

संरक्षकदेवता:

प्राचीन संस्कृतींमध्ये सर्पाला आरोग्य, क्षेत्र, धन, धान्य, संतती, परलोक यांची संरक्षक देवता मानले गेले आहे.  सर्पदंशाबद्दल असणारी भीती, सर्पविषाने ओढवणारा मृत्यु या गुणधर्मांमुळेच त्यास संरक्षक म्हणून पाहिले गेले असावे.

हेकेट नामक ग्रीक स्त्रीदेवता अथेन्सची संरक्षकदेवता म्हणून ओळखली जाई. तिच्या केसामधून सर्प बाहेर येताना दाखविले जाते. शहरातील मार्ग, सीमा, चौक, दारे व परलोक यांच्याशी तिचा संबंध असल्याचे दिसते. शहर किंवा घरात वाईट शक्तींना येण्यापासून अवरोध करणे हे तिचे प्रमुखकर्म. त्यामुळेच विजेरी, कुत्रा, चावी व सर्प ही प्रतीके तिच्याशी जोडली गेली आहेत. नेहेबकाउ या ईजिप्तमधील देवतेची प्रतिमा सर्पाकृती असून परलोक अथवा पाताळ त्याचप्रमाणे फेरोंची जीवंतपणी व मृत्युनंतरच्या प्रवासातील संरक्षक देवता होय.

प्राचीन इजिप्तमधील ’ओरोबोरस’ हे प्रतीकात्मक चिन्ह- स्वत:ची शेपूट तोंडात घेतलेला सर्प असे आहे. तयार होणारा वर्तुळाकार आकार ’अविनाशित्वा’चे प्रतीक म्हणून गणला जातो. तुतानकामेन या फेरोच्या थडग्यावर ओरोबोरसचे चिन्ह कोरलेले आढळते. एनिग्मॅटीक बुक ऑफ नेदरवर्ल्ड या ग्रंथामध्ये या चिन्हाचा संदर्भ प्रथमत: सापडतो. मेरेतजर नावाची ईजिप्शियन स्त्रीदेवता सर्पमुखधारी असून ती नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यालगतच्या थिबन नेक्रोपोलिस या विस्तृत प्रदेशाची संरक्षकदेवता होय. अनेक फेरोंच्या ममींच्या शवपेटीकांवर तिचे चित्र आढळून आले आहे.

Figure 2: Asclepius

रोगांपासून संरक्षण करणारी देवता किंवा रोग बरे करणाऱ्याची क्षमता सर्पांमध्ये असल्याची समजुत प्राचीन संस्कृतीमध्ये दिसून येते. निन्गिसजिदा ही संरक्षक देवता मेसोपोटेमियामधील देवता सर्पमुकुट धारण करते. तिचा संबंध पाताळ किंवा परलोक, रोगनिदान यांच्याशी आहे. अस्लिपियस / हिपियस नावाचा भैषज्यदेव प्राचीन ग्रीक संस्कृतीमधील रोगनिदानाशी संबंधित आहे.  त्याच्या हातात दंडाला वेटोळे घातलेला सर्प आहे. रोगनिदानासाठी अस्लिपियसचे पूजन त्याच्या देवळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होत असे. रुग्ण विधिपूर्वक स्नान व उपवास करुन रात्री मंदीरात झोपत असत. अस्लिपियस त्यांच्या स्वप्नात येत असे व सकाळी उठल्यावर रुग्ण बरा झालेला असे.

मरणोत्तर जीवन पुनर्जन्म:

सर्पांमध्ये कात टाकणे व नवीन त्वचा धारण करण्याची नैसर्गिक क्षमता असते. त्यामुळेच साप हा नवनिर्मिती, पुनर्जन्म, पुनरुज्जीवन व अमृतत्त्वाचे प्रतीक म्हणून पाहिला जातो. चीनी पुराकथेप्रमाणे ’नु वा’ या अर्धमानव व अर्धसर्पाकृती देवतेने मनुष्यांची निर्मिती केली. तिने अनेक स्त्री-पुरुष निर्माण केले. सततच्या निर्मितीची व्यवस्था लावण्यासाठी म्हणून तिने स्त्री-पुरुषांच्या संभोगातुन मनुष्यनिर्मितीची संकल्पना शोधून काढली. त्यामुळेच ती प्रजननदेवता म्हणून ज्ञात झाली. पाषाणापासून बनलेल्या लैंगिक अवयवाच्या मूर्तिंमध्ये तिचे पूजन होऊ लागले. चीनी पुराकथीय शिल्पांमध्ये ’नु वा’ व ’फु सी’ यांना एकत्र दाखवले जाते. परस्परांमध्ये गुंतलेली त्यांची वरील शरीरे मानवी तर अधोभाग सर्पाकृती दाखवला जातो. हान वंशातील बऱ्याचशा राजांच्या थडग्यांवर, शवपेटीकांवर ही आकृती कोरलेली आढळते. प्राचीन हान वंशापासून ते टॅंग वंशापर्यंतच्या काळात चीनी लोक नु वा व फु सी यांची मृत्युनंतर रक्षण करणारे देव म्हणून पूजा करत असत.

Figure 3: Minoan Snake goddess

प्राचीन नॉर्स संस्कृतीमध्ये योरमुनगाण्डर नावाचा सर्पसमुद्रनिवासी विश्वसर्प म्हणून गणला जातो. तो इतका विशालआहे की संपूर्ण विश्वाला व्यापून देखील स्वत:च्या शेपटीला गिळंकृत करु शकेल. त्यामुळे होणारा वर्तुळाकार आकार हा व्यापकत्त्व व शाश्वतता यांचे प्रतीक आहे. ईजिप्तमधील क्रेटे या शहरातील उत्खननात दोन स्त्रियांच्या सर्पमूर्ती सापडल्या आहेत. या प्राचीन मिनोअन संस्कृतीमधील (अंदाजे ई..पू.१६००) मूर्ती असून त्या पृथ्वीदेवतेचे प्रतीक मानल्या जात असत. त्यांचा संबंध मृत्यु, पुनर्जन्म यांच्याशी असल्याचे दिसते.

ग्रंथसूची:

  • Ganvir, Shrikant, “Representation of Naga in the Buddhist Art of Amaravati: A Sculptural Analysis” Proceedings of the Indian History Congress, vol. 71, 2010, pp. 1063-1071
  • Hambley, Wilfrid, Serpent Worship in Africa, Filed Museum of Natural History Chicago, 1931
  • Lurker, Manfred, The Routledge Dictionary of Gods and Goddesses, Devils and Demons, Routledge, London and New York, 1984
  • Mate, M. S. “Riddle of the Nagas” Bulletin of the Deccan College Post Graduate and Research Institute, vol. 72/73 (2012-13), pp.331-335
  • www.arthistoryresources.net.snakegoddesses/

छायाचित्र स्रोत:

Figure 1: Demeter https://feminismandreligion.files.wordpress.com/2016/05/images-2-5.jpeg?w=700

Figure 2: Asclepius https://riordan.fandom.com/wiki/Asclepius

Figure 3: Minoan Snake goddess https://www.pinterest.com/pin/473229873328493767/